Sunday, January 20, 2008

मंगळगड व कावळ्या दुर्गभ्रमण

जावळीच्या खोऱ्यातील ढवळ्या घाटावर लक्ष ठेवणारा  मंगळगड हा मोक्याच्या ठिकाणी (विकीमॅपीआ) आहे. इथून तोरणा, राजगड, प्रतापगड, मकरंदगड, रायगड असे किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. चढायला सोपा आणि पायथ्यापर्यंत गाडी जाते म्हणून एका दिवसात होतो. ह्यालाच जोडून कावळ्याही करता येतो किंवा एखादा दिवस वाढवला तर चंद्रगडही करता येतो.

मंगळगडाचे दुसरे नाव कांगोरी असेही आहे.

एका दिवसात मंगळगड आणि कावळ्या करायचा म्हणून आम्ही (मनोज, कीर्ती, मंदार आणि मी) चौघे २० डि‌से. २००८ ला पहाटे ६:३० ला पुण्याहून निघालो. उजाडायच्या आत भोर गाव गाठले. तिथे अर्धा तास नास्ता करण्यात गेला. भोर वरून थेट निघालो ते वरंध घाटा कडे. वाघजाई मंदिराच्या आधी २-३ कि.मी. सोनेरी उन्हे पडलेल्या सह्याद्रीच्या रांगांचा फोटो (राजगड , तोरणा , रायगड ) काढले. 

वरंध घाट उतरला की ज्या गावच्या नावे हा घाट आहे ते वरंध गाव लागते. तिथून २-३ कि.मी महाडच्या दिशेने गेले की ढालकाठी म्हणून एक फाटा (विकीमॅपीआ) लागतो. (शिवथरघळीच्या फाट्याच्या पुढे). तिथून डावीकडे (वरंधा कडून महाडकडे येताना) १७ कि.मी. वर हा गड आहे.  हा १७ कि.मी चा रस्ता काही डांबरी आणि काही कच्चा आहे. हा रस्ता पिंपळवाडी ह्या गावाला नेऊन पोचवतो. तिथे गाडी लावायला शाळेजवळ जागा आहे. जवळच हातपंपावर पाणीही भरून घेता येते. रात्री वस्ती करायला शाळेचा व्हरांडा उपयोगी पडू शकतो. १०:३० ला गावात पोचलो आणि थेट  गडावर चालायला सुरुवात केली. गडावर जायचा मार्ग जवळच एका पाटीने दाखवला आहे.

चालायला सुरुवात केल्यावर १००-१५० मीटर नंतर एक रस्ता वरती जातो तर एक सरळ. वरती जाण्याच्या रस्त्यावर २ पायऱ्या आहेत. एक पायरीवर वरचा मार्ग दाखवणारा बाण काढला आहे. वरचा रस्ता गडावर पोचवतो. जवळच एक वरून येणारा ग्रुप बसला असल्यामुळे आम्ही चुकायचो वाचलो. नाहीतर सरळ जाऊन जंगलात हरवलो असतो. डांबरी रस्त्यावरून वरती चढायला सुरुवात केली की १०० मीटर वर उजवीकडे बसायचा कट्टा लागतो. तिथून रस्ता डावीकडे वळतो. त्या वळणापासूनच १० एक हातांवर उजवीकडे ह्या पायऱ्या आहेत.

वाटेत ढोरवाटा भरपूर आहेत. बाणही दाखवले आहेत. मुख्यता उजवीकडचा रस्ता पकडावा. काही ठिकाणी ह्याला अपवाद आहेत. पण रस्ता बऱ्यापैकी मळलेला आहे. ही वाट मुरमांच्या खडीने निसरडी झाली आहे. नागमोडी वळणे घेत ही वाट एका पठारावर नेऊन पोचवते.  इथूनच डावीकडे मंगळगडाचे दर्शन होते. पठारावर पोचल्यावर डावीकडची वाट गडावर जाते. मध्येच झाडी, मध्येच मोकळी वाट असे करत करत आपण गडाच्या नाकाच्या खाली येतो. (विकीमॅपीआ) इथे एक वाट डावीकडे तर एक उजवीकडे जाते. डावीकडची वाट (गड उजवीकडे ठेवत) गडावर घेऊन जाते. तर उजवीकडची वाट वाटघर ह्या गावाला जाते. ह्याच गावाने पुढे चंद्रगडावर (विकीमॅपीआ) जाता येते.

डावीकडची वाट पकडली की समोर एक बेचके दिसू लागते. ह्याच बेचक्याने वरती चढायची वाट आहे. आता वाट बऱ्यापैकी जंगलातून जाते त्यामुळे उन्हाचा तडाखा एव्हढा जाणवत नाही. दरवाज्यातून वरती चढल्यावर समोरच एक माची आणि त्यावरचे मंदिर (विकीमॅपीआ) दिसू लागते.  वरती पोचल्यावर समोर महाबळेश्वरचे पठार, चंद्रगड दिसतात. जराश्या उजवीकडे प्रतापगड आणि मधु-मकरंदगड दिसतात. पाठीमागे लांबवर तोरण्याचेही दर्शन घडते.

मंदिराकडे जाताना उजवीकडेच एक छोटेसे पाण्याचे टाके आहे (विकीमॅपीआ). अजून पुढे गेले की उजवीकडेच अजून मोठे पाण्याचे टाके (विकीमॅपीआ) दिसते. उन्हाळ्यात पाण्याची तशी बोंबच असणार. तरीपण प्यायला पाणी मिळेल. पाणी हिरवट रंगाचे आहे. त्यामुळे जर खूपच जरुर पडली तरच प्यावे. मंदिर पावसाळा सोडून इतर ऋतूमध्ये राहायला व्यवस्थित आहे. मंदिरावरचे बरेशचे पत्रे उडून गेले आहेत. मंदिरात मोठी मोठी तपेली ठेवली असल्यामुळे त्यात अन्न शिजवता येईल. ढाक च्या भैरी एव्हढी भांडी नसली तरी १५-२० माणसांचे जेवण होईल एव्हढे मोठे भांडेही आहे.

मंदिरात पोचेपर्यंत १२:३० वाजले होते. न थांबता आणि वेगात चढले तर एक-सव्वा तासात वरती चढता येईल. दुपारचे जेवण करून आम्ही गड पाहायला निघालो.

गडावर तसे पाहण्यासारखे टाक्या आणि पडके अवशेषच राहिले आहेत. गडाच्या डावीकडच्या अंगाने वरती चढताना काही पाण्याची टाकी (विकीमॅपीआ) लागतात. त्यात बऱ्यापैकी पाणी होते. वरती चढल्यावर वाड्याचे पडके अवशेष दिसतात. सरळ पुढे गेल्यावर वाट उत्तरेकडच्या माचीवर पोचवते. तिथून आपण आलो ते पिंपळवाडी दिसते. समोर राजगड, तोरणा दिसतात. डावीकडे रायगड दिसतो. डोंगरयात्रा ह्या पुस्तकाप्रमाणे उजवीकडे अस्वलखिंड आणि जननी दुर्ग दिसतो (हे काही नीटसे ओळखता आले नाहीत.).

जवळपास १:३० च्या सुमारास आम्ही परत खाली निघालो. १ तासात २:३० ला  गाडी लावण्याच्या ठिकाणी पोचलो. गावात शाळेजवळ हातपंपावर पाणी भरून , हात , तोंड धुऊन वरंध घाटाच्या दिशेने निघालो.

एक महिन्यापूर्वीच वरंध घाटात बिबट्या दिसल्याची खबर होती. रस्त्यावर १०-१५ मिनिटे बसून होता. खूप वर्षांनी वरंध घाटात बिबट्याची बातमी ऐकली. २ एक आठवड्यापूर्वी ह्याच घाटात वाटमारी करणाऱ्या चोरट्यांना पकडले. त्याची कहाणी सुरस आहे. माझेरी गावात वनखात्याचे एक ऑफिस आहे.  तिथून वरून खाली येणाऱ्या गाड्या दिसतात.  रात्री त्यांचे दिवे सहज दिसतात. एका रात्री वनअधीकारी जागून वरच्या गाड्या पाहत होता. वरून एक गाडी त्याला खाली येताना दिसली. अर्धा तास झाला तरी त्याला ती गाडी माझेरी पास करून जाताना दिसली नाही. त्यामुळे त्याला संशय येऊन त्याने वरती जाणाऱ्या सगळ्या गाड्या माझेरीतच थांबवून  ठेवल्या. पोलिसांना फोन करून त्यांना बोलवून घेतले. साध्या गाडीने पोलीस वरती निघाले. वरंध घाटात एका यू वळणावर त्यांना एक इंडीका दिवे बंद करून थांबलेली आढळली. त्यातच चोर लपून बसले होते. ही लोक वरून किंवा खालून येणाऱ्या गाड्यांना अडवत असत आणि लूटमार करत असत. ह्या वळणावर वेग कमी असल्यामुळे त्यांना सहज लूटमार करता येत असे.

वरंध गावाकडे येत असताना जिथे रायगड दिसायला सुरुवात होते त्या आधीच जवळ कोकणदिवाही (विकीमॅपीआ) ५ एक सेकंद (गाडीतून) दर्शन देऊन जातो.

वरंध घाटातून वरती चढल्यानंतर जिथे रायगड जिल्ह्याची हद्द संपते तिथेच कावळ्या किल्ल्याची वाट आहे (विकीमॅपीआ). हा किल्ला फोडून वरंध घाट बनवला आहे.   त्या वळणावरच गाडी कडेला लावता येते किंवा वाघजाई मंदिरा पाशी गाडी लावता येते. फक्त माकडांपासून सांभाळावे लागते.

वरंध घाट कावळ्या किल्ल्याला दोन भागात विभागतो. उत्तरेकडचा भाग हा शिवथरघळीकडे तोंड करून आहे. तर दक्षिणेकडचा बरोबर वाघजाई मंदिराच्या वरती आहे. भोरकडून येताना कावळ्या किल्ल्याचे दोन्ही भाग मस्त दिसतात (कावळ्याचा उत्तरेकडचा भाग , कावळ्याचा दक्षिणेकडचा भाग ). बरेचसे लोक उत्तरेकडच्या बाजूस जातात. घाटाच्या वळणापासूनच ह्या भागाकडे वाट जाते. डावीकडची वाट पकडली की मुरूम आणि खडी वरून ही वाट पठारावर पोचवते. वरच्या पठारावरून शिवथरघळीचे दर्शन होते. कावळ्या किल्ल्याला टेकूनच असलेल्या वानरलिंगीचेही (विकीमॅपीआ) दर्शन होते. इथून एक वाट शिवथरघळीला (विकीमॅपीआ) जाते असे ऐकले आहे.

पठारावरून वाट उजवीकडे खाली उतरते. ह्या वाटेने खाली उतरून डावीकडे वळले की छोटेसे विटांचे बांधकाम दिसते. उजवीकडे काही खोपट्याही दिसतात. इथून पुढे वाट बुजलेली आहे. जिथे विटांचे बांधकाम आहे त्याच्याच पाठीमागच्या टेकाडावर भगवा (विकीमॅपीआ) आहे. पण त्यावर जायचा रस्ता ह्या टेकाडाला उजवीकडून वळसा घालून आहे. वाट शोधत शोधत गेले की भगव्या पाशी पोचतो. वरंधा घाटातून (कावळ्यावरून दिसणारा वरंध घाट ) इथे यायला फक्त अर्धा तास लागतो. वरून समोर राजगड, तोरणा, मढेघाट, गोप्याघाट (विकीमॅपीआ), रायगड हे सर्व दिसते.खालचे दृश्य ही नयनरम्य दिसते.

आम्ही परत फिरलो तेव्हा संध्याकाळचे ५:१५ वाजले होते. ६:२० ला च्या आसपास सूर्यास्त होत असल्यामुळे लवकरात लवकर कावळ्याचा दुसरा भाग करायचा होता. वाघजाई मंदिरापाशी पोचून एका टपरीवर दुसऱ्या भागावर कसे जायचे हे विचारले. त्यांनी सांगितले की जवळच वरती जायचा रस्ता आहे. हे टपरीवाले तिथूनच पाणी आणतात. तेव्हढ्यात एक बाई वरती जाताना दिसली, म्हणून चहाची ऑर्डर रद्द करून आम्ही त्या बाईच्या पाठीमागे गडावर निघालो. वाघजाई मंदिरापासून भोरच्या वाटेकडे ५०-७० मीटर वर ही वाट फुटते. टाक्यांपर्यंत मळलेला रस्ता असल्यामुळे काहीच अडचण येत नाही. वरती चढायला एकदम सोपे आहे. वरती पाण्याची ९ टाकी आहेत (विकीमॅपीआ). ह्यांनाच नवटाकी असेही म्हणतात. तिथूनच वाघजाई मंदिराच्या बरोबर वरती असलेल्या मंदिराकडे वाट जाते. मी इतक्या असंख्य वेळा वरंध घाटातून आलो आहे पण वरती अजून एक मंदिर आहे आणि भगवा आहे हे काही दिसले नव्हते.

मंदिर म्हणजे काही मुर्त्या ठेवल्या आहेत. टपरीवाले ह्याची पुजा अर्चा करतात. मंदिरापासून पुढे गेले की काही पायऱ्या दिसतात.  हा गडाचा दरवाजा असावा (विकीमॅपीआ). घाट बनवताना सगळे जमीनदोस्त झाले असावे.  इथून खाली वाघजाई मंदिर आणि रस्ता दिसतो. खालून काही लोक आमच्या कडे अचंबित नजरेने पाहत होते की ही माणसे वरती कशी गेली.

परत टाक्यांपाशी आल्यावर वरती जायला एक वाट फुटते. तिथून सर्वात वरती जाता येते. इथून वरंध घाटातली वळणे (विकीमॅपीआ) मस्त दिसतात. वरती देखाव्या शिवाय पाहायला असे काही नाही. जर कधी संध्याकाळी ह्या घाटातून जात असलो तर अर्धा तासात वरती येऊन जायला काहीच हरकत नाही.

६:२० ला सूर्यास्ताच्या सुमारास खाली उतरलो आणि मस्त भज्यांवर ताव मारला. चहा आणि आठवणी घेऊन परतीच्या वाटेला लागलो.

ह्या भ्रमंतीचे फोटो (मंगळगड, कावळ्या) इथे ठेवले आहेत.

:-आनंद

ता.क. : हा लेख मायबोली आणि मनोगत वरही प्रकाशीत केला आहे.

Sunday, December 23, 2007

रतनगड ते हरिश्चंद्रगड

रतनगड ते हरिश्चंद्रगड हा ट्रेक तसा अजूनही दुर्लक्षितच. जालावरही तशी ह्याची कमी माहिती मिळते.

नाताळच्या सुट्टीत रामघळ-भैरवगड किंवा हा ट्रेक असे विकल्प होते. चक्रम हाईकर्स ने हा आणि बाकीचे आजूबाजूचे किल्ले १९९५ मध्ये केले होते. त्यातील रवी वैद्यनाथनशी दोन्ही ट्रेक विषयी बोललो आणि रतनगड ते हरिश्चंद्रगड ठरवला. ह्या दुव्याचाही बराच उपयोग झाला. जर दोन्ही गड वरपर्यंत करायचे नसतील तर हा २ दिवसात सहज होतो. १२ तासाचा हा रस्ता आहे.

रतनगडाला जायला संगमनेर ते इगतपुरी ह्या रस्त्यावरील शिंदी ह्या गावावरून जाता येते. पुण्यावरून दु. १:३० ची एक एस.टी तिकडे जाते, पण संध्याकाळी तिकडे पोचली तर रात्रीची रतनवाडीला जायला जीप मिळेलच ह्याची खात्री नाही. तसेच अर्धा दिवस प्रवासातच जातो. जास्ती लोक असतील तर हे परवडते, कारण जीप तिकडे यायला तयार होतील. आम्ही चारजणच असल्यामुळे रात्रीच निघायचे ठरवले. संगमनेर पर्यंत एस.टी मिळते, नंतर इगतपुरीसाठी रात्रीची एस.टी नाही.

आम्ही चारजण (प्रसाद, सुदर्शन, निलेश आणि मी) असे शुक्रवारी,२३ डिंसेबरला रात्री १२ ला निघालो आणी पहाटे ३ वाजता संगमनेर ला पोचलो. (रु.११५/- प्र.). सकाळी ७ वाजता शिंदीला जायला एक एस.टी आहे हे कळल्यामुळे तोपर्यंत एस.टी स्थानकावरच झोप काढायची ठरवले. रात्रीच्या एस.ट्यांचा आवाज आणि डास ह्यामुळे सारखी चुळबूळ चालूच होती. शेवटी ५ वाजता कुठली दुसरी गाडी मिळते का हे पाहायला फेरी मारली. स्थानकातच काही गाड्या वृत्तपत्र उतरवत होत्या. तिथल्या एका गाडीवाल्याने राजूर पर्यंत पोचवायचे आश्वासन दिले. (रु. ३० प्र.). जितक्या लवकर रतनवाडीला पोचू तितक्या लवकर ट्रेक सुरू होईल ह्या विचाराने त्या व्हॅन ने जायचे ठरवले.

वाटेत वृत्तपत्र वाटत (फेकत) गाडी अकोलेच्या दिशेने जाऊ लागली. गाडीतच सकाळ ह्या वृत्तपत्राचा एकजण बसला होता. त्याने सांगितले की रोज रात्री १:३० वाजता शिवाजीनगरवरून "सकाळ" ची एक गाडी संगमनेर ला येते. त्याने आलात तर ५ वाजता संगमनेर ला याल आणि ह्याच गाड्यांतून पुढे जाऊ शकाल. अकोलेला ह्या गाड्या थांबल्या (स. ६:००) तेव्हा ११ जणांचा एक ग्रुप दिसला, तोही रतनगडावर चालला होता. अकोले वरून ६:३० ला शिंदी ला एस.टी जाते त्याने ते येणार होते.

हरिश्चंद्रगड च्या पायथ्याचे पाचनई ह्या गावात आम्ही जाणार असल्यामुळे तिकडून काही गाड्या आहेत का ह्याची चौकशी स्थानकात केली. दत्त जयंती मुळे नारायणपुर ला जास्तीच्या गाड्या सोडल्या होत्या, त्यामुळे दुपारची एस.टी पाचनई ला नाही येणार असे सांगितले. तसेही ११ नंतर तिकडे गाडी नाही हेही सांगितले. जर पाचनईला दुपारनंतर पोचलो तर काय हा यक्षप्रश्न उभा ठाकला. गड चढून खिरेश्वरला जायचे म्हटले तरी ५ तास मोडणार आणि रात्री १० नंतर आळेफाट्याला गाडी मिळेलच ह्याची खात्री नाही. पाचनई वरून लव्हाळे गावात (६ कि.मी.) आले तर कदाचित गाडी मिळू शकेल असे सांगितले. जे होईल ते पाहू असा विचार करून बेत न बदलण्याचा निर्णय घेतला.

राजूर ला पोचलो तेव्हा सकाळचे ६:३० वाजले होते. जीपवाल्यांनी अडवून घ्यायला सुरुवात केली. शिंदीसाठी ४०० रु. जीपसाठी सांगायला लागले. (रतनवाडी पर्यंत ५००). शेवटी १००रु. वर शिंदीपर्यंत सौदा ठरला. जीपवाल्याने अर्धा तास तिथेच टाईमपास केला आणि नंतर शिंदीला गाडी नेली. शिंदीला पोचेपर्यंत सकाळचे ८:०० वाजले. नाश्ता तयार होईपर्यंत जीप वा होडी मिळते का म्हणून फेरी मारली. इथेही जीपवाले ५००-६०० मागत होते. मागच्या वेळी कितीला जीप ठरवली होती ते आठवत नव्हते, त्यामुळे अडचण झाली होती. मागून येणाऱ्या ग्रुप साठी थांबावे लागणार होते. एक बोट नुकतीच गेली असल्यामुळे ९:३०-१०:०० पर्यंत मोटार बोट येईपर्यंत थांबायचे ठरवले. तेव्हढ्यात घाटघरचा एक जीपवाला २५०/- रु. मध्ये तयार झाला. घाटघर हे रतनवाडीच्या पुढचे गाव आहे. त्यामुळेच तो एव्हढ्या स्वस्तात पटला. नाहीतर ४००/- हा नियमित रेट आहे.

निघताना अकोलेवरून एस.टी आली (स. ९:००). मागच्या ग्रुपला विचारले तर त्यांना बोटीनेच यायचे होते त्यामुळे आम्ही ४ जणच रतनवाडीच्या रस्त्याला लागलो(स.९:००). हा रस्ता खडीचा असल्यामुळे इथे जीपच सोयीस्कर पडते. रतनवाडीला स. ९:३० वाजता पोचलो.

रतनवाडीत हेमाडपंथी पद्धतीचे अमृतेश्वर मंदिर आहे (विकीमॅपीया). एक रात्र तिथेच राहवे असे सुंदर मंदिर आहे. फक्त रात्री तिथे पोचणे अवघड आहे (जीप वा बोट मिळणे), त्यामुळे अजूनही ही इच्छा पूर्ण झालेली नाही. रतनवाडीतून निघेपर्यंत १०:०० वाजले. निघताना मघाशचा ग्रुप येताना दिसला. म्हणजेच आम्ही जीप, व्हॅनने आलो तरी फक्त अर्धा तासाचाच फरक पडला. वरती जास्तीचा खर्च झाला. :(

रतनगडावर आधी आल्यामुळे रस्ता तसा माहितीचा होताच. रतनगडावर जायला एक खुट्ट्याच्या कडेने एक रस्ता आहे. खुट्टा म्हणजेच उजवीकडे जो सुळका दिसतो तो. हा रस्ता सोपा आहे पण लांबचा आहे. जवळचा रस्ता रतनगडाच्या मध्यातून जातो. वरती शिड्या लावल्या आहेत तरीपण खडी चढण आहे. हरिश्चंद्रगडाचा फाटा ह्याच रस्त्यावर येत असल्यामुळे आणि आम्हाला रतनगडावर जायचे नसल्यामुळे मध्यातून जाणारा रस्ता पकडला. मुख्य रस्त्याला लागेपर्यंत ढोरवाटा फक्त सांभाळाव्या लागतात. एकदा रस्त्याला लागल्यावर चुकायची शक्यता कमीच आहे. वाटेत २-३ वेळेला ओढा ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात ह्या ओढ्याला जबरदस्त ओढ असते, त्यामुळे ह्या वाटेऐवजी दुसऱ्या वाटेने जावे लागते. त्यावेळी कुठल्यातरी गावकऱ्याला मदतीला घेऊनच जावे लागते. रतनगडाला जायचा हा रस्ता जंगलातून जात असल्यामुळे उन्हाचा जास्ती त्रास होत नाही. तरीपण घाम मात्र निघतो. ही वाट एका मोठ्या वाटेला मिळते. तिथूनच रतनगडावर आणि हरिश्चंद्रगडाकडे रस्ता जातो. ह्या फाट्यावर रतनगडाकडे तोंड करून उभे राहिले तर वरती जाणारा रस्ता रतनगडाकडे जातो. उजवीकडचा रस्ता घाटघरला जातो तर डावीकडचा हरिश्चंद्रगडाकडे जातो.(विकीमॅपीया) ह्या फाट्यावर रतनगडावर जाण्याचा बाण काढला होता. तर "हरीश" म्हणून हरिश्चंद्रगडाचा रस्ता दाखवला आहे. ह्या फाट्याला येईपर्यंत ११:१० वाजले होते. आम्ही चारही जण चांगले चालणारे असल्यामुळे वेळेत पोचलो होतो.

५-१० मि. विश्रांती घेऊन हरिश्चंद्रगडाकडे निघालो. आता हा रस्ता नवीन असल्यामुळे वाट शोधतच जावे लागणार होते. उपलब्ध माहितीप्रमाणे, पुढे कात्राबाईची खिंडीतून कुमशेत ह्या गावी उतरायचे होते. कुमशेत गाव हे ह्या ट्रेकच्या मध्याला येते. तिथून पेठाची वाडी आणि मग पाचनई असा रस्ता आहे. वाटेत "H" असे लिहून बाण काढले आहेत अशीही माहिती होती.

जंगलातून पुढे निघालो तर समोर कात्राबाईचा सुळका दिसायला लागला. उजवीकडे रतनगड साथ करतच होता. वरचा भगवा आणि गुहा खालूनही स्पष्ट दिसत होता. जरासे पुढे गेल्यावर आम्ही रतनगड आणि कात्राबाईच्या मधल्या मोकळ्या जागेत पोचलो. इथून रस्ता जरासा डावीकडे वळतो. कात्राबाईच्या डावीकडे दोन छोट्या टेकड्या आहेत त्यांच्या मधून (खिंड) हा रस्ता जातो. रतनगड च्या फाट्यावरून जरासे पुढे आले की आणि ही छोटीशी खिंड पार केल्यावरच ह्या दोन डोंगरातून (विकीमॅपीया) आपण आलो हे कळते. रस्ता पार करताना हे कळत नाही कारण आजूबाजूला दाट जंगल. वरती म्हटल्याप्रमाणे मोकळ्या जागेतून रस्ता डावीकडे रस्ता जातो (विकीमॅपीया). त्यावेळी रतनगड डावीकडे पण पाठीमागे दिसतो. लांबवर अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई दिसतात. हेच रतनगडाचे शेवटचे पूर्ण दर्शन. रस्ता तसा मळलेला आहे त्यामुळे खिंडीत जायला तशी अडचण येत नाही, पण एका ब्लॉगवर लिहिल्याप्रमाणे इथे जरासे जपून. जर पुढे रतनगड डावीकडेच दिसत राहिला तर तो चुकीचा रस्ता आहे हे समजून घ्यावे.

खिंडीत पोचल्यावर रस्ता उजवीकडे खाली उतरायला लागतो (विकीमॅपीया). समोर कात्राबाईची अजस्र भिंत दिसते. जरासे पुढे गेल्यावर कळते की आपण कात्राबाईच्या सुळक्याला वळसा घालून आलो आहोत. पण हा रस्ता जंगलातून जात असल्यामुळे वळसा घालताना सुळका दिसत नाही. कात्राबाईच्या ह्या भिंतीच्या कडेकडेने हा रस्ता जातो. अधेमधे "H" असे बाण दिसतात. पण नेमके काही मोक्याचे ठिकाणी हे बाण नसल्यामुळे जरासा गोंधळ होतो. कात्राबाईच्या भिंतीला वळसा घालून हा पूर्ण चढ चढायचा आहे. रस्ता मळलेला आहे. त्यामुळे त्याच रस्त्यावर चालणे ठेवावे. पुढे आल्यावर, खिंड दिसायला सुरुवात होते ("V" आकाराची). जरी ही चढण कमी भासली तरी पुढे बऱ्यापैकी चढायचे आहे. डावीकडच्या डोंगराचे नाव "घनचक्कर" आहे. रस्ता बांधीव दगडांनी बांधला आहे. बऱ्यापैकी सावली असल्यामुळे आम्ही जेवणासाठी थांबायचे ठरवले. दुपारचा १:०० वाजला होता. पुढे सावली मिळेलच याची खात्री नव्हती त्यामुळे पूर्ण खिंड (विकीमॅपीया) न चढता तिथेच थांबलो. नंतर वरती चढल्यावर कळले की वरती सावली नाहीच. त्यामुळे तो निर्णय बरोबरच होता.

जेवण आणि विश्रांती घेऊन निघेपर्यंत १:४० वाजले. वाटेत कुठेही पाणी नाही, त्यामुळे पाणी जपूनच वापरावे लागत होते. जंगल असल्यामुळे उन्हाचा तडाखा तसा कमी होता.

खिंड चढायला सुरुवात केली तेव्हा कळले की खालून कमी भासणारी चढण तशी वरती बरीच आहे. चढत चढत कात्राबाई आणि घनचक्कर ह्यांच्या मध्यात येऊन पोचलो. इथून पाठीमागे कात्राबाईचा सुळका आणि भंडारदराचे पाणी ह्यांचे नयनरम्य दर्शन होते. डावीकडचा वरती जाणारा रस्ता कात्राबाईकडे जातो. जरासे वरती (१०० मि.) गेल्यावर मारुतीचे मंदिर आहे. (सावली नाही) . डावीकडचा रस्ता घनचक्करला जातो. समोरचा उतरणारा रस्ता कुमशेत ला जातो. (विकीमॅपीया). वरून छोट्याश्या धरणाच्या डावीकडे वसलेले कुमशेत दिसते. वरून वडकी सुळक्याचेही दर्शन होते.

कुमशेत पर्यंत रस्ता मळलेला आहे. मध्ये एका ओढ्याला पार करून समोरच्या डोंगरावरून हा रस्ता कुमशेत ला उतरतो (विकीमॅपीया). कुमशेतला शाळेत राहता येते. जवळच पाणीही असल्यामुळे राहायची व्यवस्था चांगली होते. आम्ही दु. ३:३० पर्यंत कुमशेत ला पोचलो.

एव्हढ्या लवकर कुमशेतला पोचल्यामुळे आजच पेठाच्या वाडीला जायचे ठरले. गाडीरस्ता सोडून डावीकडच्या घरांवरून रस्ता एका चढणीवर जातो (विकीमॅपीया). ती चढण चढली की माळरान लागते. ह्या माळरानावर ढोरवाटा भरपूर आहेत. डावीकडे एक बऱ्यापैकी मळलेला रस्ता आहे (विकीमॅपीया). तोच रस्ता पुढच्या गावाला पोचवतो. हा रस्ता माळरानाच्या डावीकडून खाली उतरतो. खाली उतरताना डावीकडच्या दरीत उतरतो की काय असे भासते. रस्त्यावर बाणही नसल्यामुळे आम्हाला जरासे गोंधळायला झाले. पण पुढे गेल्यावर समोर दरीत दोन ओढ्यांचा संगम (विकीमॅपीया) आणि त्याच्या समोरच कलाडगड दिसला. रस्ता खाली नदीच्या कडेला उतरतो (विकीमॅपीया). इथे येईपर्यंत आम्हाला ५:०० वाजले होते. पायही आता थकल्यामुळे वाडीतच मुक्काम करायचे ठरवले.

जवळच एक गुराखी भेटला, त्याने कलाडगडाच्या पायथ्याशी दिसणारी एक झोपडी दाखवली आणि तेच पेठाची वाडी (विकीमॅपीया) असे सांगितले. वाडीच्या जवळ आल्यामुळे आम्हीही जरासे सैलावलो आणि नदीत हातपाय तोंड धुतले. सूर्य डोंगराच्या पलीकडे असल्यामुळे इथे सावलीच होती. त्यामुळे गारवा ही होताच. गार पाण्याच्या जवळ १५ मि. बसून जड पायांनीच परत पुढची चढण चढायला सुरुवात केली. गुराख्याने सांगितले होते की इथे एक मुक्कामी एस.टी. येते आणि सकाळी ५:३०-६:०० राजूरला जायला निघते. त्याने आम्ही पाचनईपर्यंत जाऊ शकू. ही अनपेक्षित सुखद बातमी होती.

वरती चढल्यावर वाडीची विहीर दिसली. आमच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या तिकडे भरून आम्ही वाडीच्या शाळेत गेलो. शाळेचे नूतनीकरण चालले असल्यामुळे सिमेंट असलेल्या खोलीतच जागा मिळाली. मला आणि निलेश ला समोरचा कलाडगड खुणावत होताच. प्रसाद आणि सुदर्शन ने खालीच विश्रांती घ्यायची ठरवली. तोपर्यंत एका गावकऱ्याने शिधा घेऊन जेवण द्यायचे मान्य केले. त्याला शिधा देऊन आणि पिठले-भाकरी सांगून मी आणि निलेश कलाडगडाकडे निघालो.

संध्याकाळचे ५:४० झाले असल्यामुळे आम्हाला तसे वेगानेच जावे लागणार होते. कलाडगडावर भैरोबा (विकीमॅपीया) आहे असे गावकऱ्यांनी सांगितले होते. माझ्या डाव्या पायाची नस दुखावल्यामुळे मी नेहमीच्या वेगात जाऊ शकत नव्हतो. तरीपण शक्य तितक्या वेगात अंधार व्हायच्या आत आम्हाला गडावर पोचायचे होते. चढण तशी खडी आहे. वरती दगडात पायऱ्या खणल्या आहेत, त्यामुळे चढायला तशी अडचण भासली नाही. वरती दगडातच एक गुहा खणलेली आहे आणि त्यात भैरोबाची स्थापना केली आहे. वर पोचेपर्यंत अंधार झाला होता. पौर्णिमा असली तरी वरचा रस्ता काहीच ओळखीचा नव्हता. म्हणून आम्ही उतरायचे ठरवले. चंद्राच्या प्रकाशात हळूहळू उतरत ७:१५ ला खाली पोचलो आणि गावात पोचेतो ७:३० वाजले होते. गावात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या.

शाळेत पोचलो तर बाकीच्या दोघांचे जेवण झाले होते. आम्हीही गावकऱ्याने बनवलेले जेवून घेतले. पिठले तसे चांगले बनवलेले होते, फक्त ती लोकं जेवणात मीठ घालत नव्हती असे सांगितले. त्यामुळे मीठ वरून घ्यावे लागले. भाकरी-पिठलं, खिचडी असा मस्त जेवण झाल्यावर झोप यायला लागली होती. एस.टी रा. ९:०० पर्यंत येते असे गावकऱ्यांनी सांगितले. तोपर्यंतही जागायची तयारी नसल्यामुळे बिछाना टाकून झोपायची तयारी सुरू केली. पेठाच्या वाडीत सगळे दिवे सौरऊर्जेवर चालतात, पण शाळेत दिवा नसल्यामुळे तसा अंधारच होता. तिथे (शाळेत) उंदीर नाहीत हेही दुसऱ्या दिवशी उठल्यावर सर्व सामान व्यवस्थित आहे हे पाहिल्यावरच कळले. पाय दुखत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी राजूरला जायचे का गडावर हा निर्णय होत नव्हता. दुसऱ्या दिवशी गाडीत ठरवू असे ठरल्यावर एक दोघेजण चक्क घोरायलाच लागले. रा. ९:०० वाजता कधीतरी एस.टी आल्यावर सुदर्शन उठून चौकशी करून आला की सकाळी ५:३० ला एस.टी निघणार आहे. झोपेतच ते ऐकले आणि मोबाईलमध्ये गजर लाऊन परत झोपून गेलो.

रात्रभर निपचीत पडल्यावर सकाळी ५:१५ ला उठलो. सॅक भरली ना भरली तोच एस.टी सुरू झाल्याचा आवाज आला. तसेच धावत पळत (पाय दुखत असल्यामुळे खुरडतच म्हणाना) एस.टी मध्ये बसलो. सुदर्शनने गडावर येणे रहित करून तसाच पुण्याला जायचा निर्णय घेतला. आम्ही तिघांनी गडावर जाऊन खिरेश्वरलाच उतरायचे ठरवले. वाहकाने सांगितले की स. ११-१२ च्या सुमारास अजून एक एस.टी येते आणि तीच शेवटची एस.टी. त्यानंतर इकडून राजूर ला जायची एस.टी नाही.

पाचनईला पोचेपर्यंत फटफटलेही नव्हते. आम्हा तिघांना गडाच्या फाट्यावर (विकीमॅपीया) सोडून एस.टी पुढे गेली. (सुदर्शनला पुण्याला पोचायला दुपारचा १ वाजला हे मागाहून कळले). रस्ता पुढे कसा असेल ते माहिती नसल्यामुळे उजाडेपर्यंत तिथेच थांबायचे ठरवले. गावातलाच एक माणूस रामप्रहरी भेटला. त्याने सांगितले की रस्ता एकदम मळलेला आहे आणि काही दिवसापूर्वीच त्या लोकांनी कारवी वैगरे कापून रस्ता चांगला केला आहे. त्यानेच छोटीशी शेकोटीही पेटवली. उजाडेपर्यंत ६:४५ वाजले. त्या माणसाचा निरोप घेऊन आम्ही त्याने दाखवलेल्या वाटेने निघालो.

रस्ता खरेच मळलेला आहे. रस्ता खड्या चढणीवरून कातळभिंतीच्या खाली येऊन पोचतो. इथे रस्ता उजवीकडे वळतो. इथून भिंतीच्या कडेकडेने रस्ता जातो (विकीमॅपीया). शेवटी रस्ता एका धबधब्याच्या सुरुवातीला येऊन थांबतो. इथे जरासे चुकण्यासारखे आहे (विकीमॅपीया). कातळ असल्यामुळे नक्की रस्ता कुठे जातो हे कळत नाही. जरा समोर पाहिले की एक बऱ्यापैकी रस्ता ओढा ओलांडून पुढे गेलेला दिसतो. इथेच नेमकी चूक होऊ शकते. हा ओढा इथे अजिबात ओलांडायचा नाही. भिंतीच्या कडेने आल्यावर ओढ्याच्या डावीकडूनच चालत राहायचे की पुढे परत रस्ता लागतो (विकीमॅपीया). इथे ओढा अजिबात ओलांडला नाही की बरोबर रस्त्याला लागतो. हा ओढा पुढे ओलांडला जातोच. आम्ही नेमकी इथेच चूक केली आणि सरळ ओढा ओलांडून गेलो. सरळ गेल्यावर अजून एक ओढा ओलांडला आणि मळलेला रस्ता न दिसल्यामुळे चुकल्याची जाणीव झाली. परत पहिल्या ओढ्याच्या इथे येऊन आम्ही भिंतीच्या कडेच्या रस्त्याला लागलो. ह्यात आमची १५-२० मि. उगाचच वाया गेली.

हाही रस्ता खूपच मळलेला आहे. समोरचा डोंगर चढला की कळते की आपण ज्या कातळभिंतीच्या कडेने आलो ती ज्या डोंगराचा भाग होती त्याच्या पलीकडे आलो आहोत. लांबवर कलाडगड, कात्राबाईची खिंडही दिसते. डों̱गरावर पोचलो की हळूहळू मंदिर दिसू लागते. मंदिरापर्यंत पोचे पर्यंत आम्हाला सकाळचे ८:३० वाजले होते. नाताळच्या सुट्टीमुळे गडावर बऱ्यापैकी गर्दी होती. अर्धा तास विश्रांती घेतल्यावर सरळ कोंकण कड्यावर जायचे ठरवले. उन्हे चढली की लांबवरचे धुरकट दिसेल त्यामुळे जितक्या लवकर पोहचू तितके बरे हा विचार होता. ९:४५ ला कोकणकड्यावर पोचलो. १०:१५ च्या सुमारास परत निघालो तेव्हा कोकणकड्यावर हळूहळूगर्दी जमायला लागली होती.

मंदिरात पोचून जराशी न्याहरी केली. पुण्यावरून काही लोक आले होते आणि त्यांचा तिथल्या शिवलिंगावर अभिषेक चालू होता. रुद्रपठणही साथीला होतेच. त्यापैकीच एका गृहस्थाने मंदिराच्या कळसात जाता येते हे सांगितले. इथे मी कुठून जाता येते ते सांगत नाही, पण ही माहिती खूप कमी जणांना असेल. ही जागा लपायला उत्तम आहे. कोणाला संशयही येणार नाही.

खालच्या मंदिराचे दर्शन घेतल्यावर ११:३० ला आम्ही खाली खिरेश्वरला जायला निघालो. परतणारे बाकीचे ग्रुपही होतेच. खाली खिरेश्वरला येईपर्यंत दुपारचा १:३० वाजला होता. भूक तशी नव्हतीच त्यामुळे लिंबूपाणी घेऊन खुबी फाट्याला यायला निघालो. एकदा नेढ्याच्या वाटेने गडावर जायचे आहे हा मागच्याच वेळेचा परत एकदा संकल्प घेऊन खिरेश्वर सोडले. नशिबाने पाठीमागून येणारा एक ट्रक मिळाला आणि आमचे ४ कि.मी. चालायचे वाचले. खुबी फाट्याच्या अलीकडे धरणाच्या पाण्यात अंघोळ करून सगळा शिणवटा घालवून टाकला. धरणाच्या पाण्यातून दिसणारी टोलार खिंड आणि डावीकडचा गड हे दृश्य मनात साठवून खुबी फाट्याला आलो. १५-२० मि. नंतर एका ट्रकने आळेफाट्याला पोचवले. (र. ३०/- प्र.). तिथे मिसळ खाऊन पुण्याची एस.टी.ची वाट पाहत बसलो. संध्याकाळच्या गाड्या तश्या कमीच होत्या. दत्तजयंती असल्यामुळे नारायणगावलाही जाण्यात अर्थ नव्हता कारण तिथे जाम गर्दी असेल. शेवटी पाऊण तासाने एक एस.टी आणि मुख्य म्हणजे बसायला जागा मिळाली. जवळपास रा. ८:३० पर्यंत पुण्यात पोचलोही.

पेठाच्या वाडीत एस.टी मिळाल्यामुळेच हा ट्रेक वेळेत पूर्ण झाला. कुमशेतला मुक्काम केला असता किंवा एस.टी नसती तर नाहीतर हरिश्चंद्रगडावरचे काहीच पाहता आले नसते.

इथे मी ह्या ट्रेकची गूगल अर्थ ची "kmz" फाइल ठेवली आहे. त्यात ह्या ट्रेकचा मार्ग रेखाटन केला आहे. चुकायच्या जागाही नमूद केल्या आहेत. तरीपण हा मार्ग "gps" घेऊन न काढल्यामुळे मार्गदर्शक म्हणूनच वापर करावा. (ही फाइल ठेवायला कुणाकडे जागा आहे का? जिओसिटीवर जास्ती दिवस ही फाइल राहू शकणार नाही)

:-आनंद

ता. क. हा लेख मनोगत आणी मायबोली वरही प्रकाशीत केला आहे.

Sunday, July 8, 2007

मल्हारगड आणी कानिफ़नाथ

पुण्याजवळचा मल्हारगड हा तसा दुर्लक्षीत किल्ला. एका दिवसाची सहल मारायची असेल तर हे एक ठिकाण विचारात घ्यायला काहीच हरकत नाही. ह्याच्या बरोबरच कानिफ़नाथही जोडता येते. वरपर्यंत गाडीमार्ग जात असल्यामुळे चढण फ़ार नाही.. विकीमॅपिआ वरचे कानिफ़नाथ आणी मल्हारगड कानिफ़नाथ ... पुण्यावरून जाताना हडपसर मधून सासवड कडे एक फ़ाटा जातो.. हडपसर चा फ़्लायओव्हर च्या खालून हा फ़ाटा असल्यामुळे हा फ़्लायओव्हर घेता खालून गेले तर उत्तम.. नाहीतर परत मागे येऊन रस्त्याला लागावे लागते. ह्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर वडकी गावापाशी, दिवेघाटाच्या अलीकडे, एक कमान लागते. त्या कमानीच्या जवळपास २०० मी. अलीकडे कानिफ़नाथाकडे असा बोर्ड लावला आहे ( विकीमॅपिआ ). वडकी गावात कोणालाही विचारले तरी तो रस्ता सांगेल.. आम्ही ज्याला विचारले तो बिहारी निघाला.. तो बहुतेक आम्हाला मराठीत बोलताना बघून घाबरला आणी मालूम नही म्हणून चालू लागला.. नंतर तोच परत आला आणी पहाडका मंदीरना असे विचारून रस्ता सांगितला. हा रस्ता आहे छोटेखानी ट्रेककरता.. ह्या रस्त्याच्या आजूबाजूला शेती असल्यामुळे पावसाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो. वाटेवर एक बंधाराही बांधला आहे. त्याला फ़ोटो मध्ये मी न्याय देऊ शकलो नाही.. पण प्रत्यक्षात हे तळे १०-१५ मिनिटे बसून डोळ्यात साठवून घेण्यासारख़े आहे. जरासे पुढे गेल्यावर रस्ता एका ओढ्याच्या कडेने जातो.. पावसाळ्याच्या दिवसात हा ओढा भरून वाहत असल्यामुळे गाड्या इथेच सोडून पायी निघावे लागते. पावसाळा नसेल तर गाड्या पुढे कुठल्यातरी घरात लावता येतील. पण पावसाळ्यात उघड्यावर (बीना राखणीच्या) गाड्या लावून पुढे जावे लागते. वाट तशी मोठी आणी बर्यापैकी मळलेली आहे.. कानिफ़नाथाचे मंदिरही दिसत असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाहीच.. जवळपास - पर्वती इतकी चढण आहे( फ़ोटो ). चढायला ते :१५ तास खूप झाला.. वाटेत सावलीला झाडे कमी आहेत... त्यामुळे उन्हाचे चढणे टाळावे.. हे आहे वाटेवरून खाली दिसणारे दृश्य वरती गेल्यावर दोन मंदिरे दिसतात. एक उंचावर आहे ते कानिफ़नाथाचे. डावीकडून एक गाडीरस्ता वरपर्यंत आलेला दिसतो. तो सासवड कडून आला आहे. खाण्याच्या टपर्या, पाण्याची टाकी इथे असल्यामुळे खाण्याचे काही नेले नाही तरी चालू शकते. कानिफ़नाथाच्या मंदिरासाठी अजून काही पायर्या चढून वर यावे लागते ( फ़ोटो ).. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे. त्यात सरपटत आत शिरावे लागते. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो.. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. कदाचित ह्यामुळेच महिलांना आतमध्ये प्रवेश नसेल.. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणी थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मशीदी सारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसले. बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते.. मंदिराच्या इथून पुण्याचे दर्शन होते. लांबवर कात्रज मधले जैन मंदिर, बापदेव घाट असे दिसते. कानिफ़नाथ ते बापदेव घाट ह्यामध्ये डोंगरावर बांधकाम दिसले. विचारल्यावर कळले की ती जमीन आता बंगले बांधण्यासाठी कुणीतरी विकत घेतली आहे. दिवे घाटाच्या पलीकडे दूरवर मल्हारगडाचा एक भाग दिसतो. कानिफ़नाथाला एक वाट दिवे घाटातूनही येते. डोंगराच्या माथ्यावरून चालत चालत कानिफ़नाथापर्यंत येता येते. वरती ज्या गाडीरस्त्याबद्दल सांगितले आहे तो सासवडमधून येतो. सासवड मध्ये एक चौक आहे..( विकीमॅपिआ ) त्यातील एक रस्ता नारायणपूर ला जातो. एक जेजुरी ला जातो. आणी एक बापदेव घाटाकडे येतो. हाच बापदेव घाट पुण्याला कोंढव्याला (लुल्लानगर) निघतो. बापदेव घाटाच्या रस्त्यावरून निघाले की जवळपास १०-१२ कि.मी. वर कानिफ़नाथाकडे फ़ाटा फ़ुटतो ( विकीमॅपिआ ). एक मोठी कमान असल्यामुळे हा फ़ाटा चुकण्याची शक्यता नाही.. कोणाला फ़क्त कानिफ़नाथ करायचे असेल तर कोंढवा-बापदेव घाट ह्या मार्गाने करता येईल.. सासवडपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही.. मल्हारगड .. पुण्यावरून येताना दिवे घाट पार केल्यावर झेंडेवाडी म्हणून एक गाव लागते ( विकीमॅपिआ ). काळेवाडीतूनही घुसता येते.. दोन्ही रस्ते नंतर एकमेकांना मिळतात.. तिथून हा किल्ला जवळ आहे... रस्ता पार वरपर्यंत जातो. सोनोरी गावातूनही रस्ता आहे.. पण त्यासाठी दिवे घाट ओलांडून जरा अजून पुढे जावे लागते.. सोनोरी गावात बरीच देवळे सुद्धा आहेत. झेंडेवाडीतून पुढे गेल्यावर मल्हारगड दिसायला सुरुवात होते ( फ़ोटो ). रस्ता खडीचा आहे.. पण बाइक नेण्यासारखा आहे ( फ़ोटो ). आजूबाजूला शेती आहे आणी पावसाळ्याच्या दिवसात सगळे हिरवेगार दिसते. ( फ़ोटो ) गडाच्या जवळपास वरपर्यंत गाडी जाऊ शकते ( विकीमॅपिआत वरपर्यंत रस्ता दिसत आहे). पण खाली पायथ्याशी गाडी लावून वरती चालत गेले तरी १५-२० मिनिटांत माथ्यापर्यंत पोचता येते. डोंगर बोडका असल्यामुळे आपण चढू ती वाट असे म्हणायला हरकत नाही..( फ़ोटो ) ह्या बाजूने दरवाज्याचे अवशेष दिसत नाहीत. पण बुरूज पूर्णपणे ढासळला आहे त्यावरून चढून गडात प्रवेश करू शकतो.. ( फ़ोटो ) गडाचा पसारा मोठा नाही. जराश्या उंचीवर बालेकिल्ल्यासारखी तटबंदी आहे.. त्यात दोन मंदिरे ( फ़ोटो ) आणी काही जोती दिसतात ( फ़ोटो ). विहिरी आणी एक मोठे टाकेही गडावर आहे. टाक्यात उतरून पाणी सहज काढण्याजोगे आहे. ( फ़ोटो ) सोनोरी गावाच्या बाजूला गडाचा मुख्य दरवाजा आहे.. हा दरवाजा बर्यापैकी शाबूत आहे. ( फ़ोटो ) गडाच्या कडेकडेने पूर्ण गडाला प्रदक्षिणा घालता येते. उत्तरेकडे अजून एक दरवाजा दिसतो.. पण तिथून कोणी आताशी चढत नसावे.. वरती असलेल्या दोन मंदिरांपैकी एक शंकराचे आहे तर दुसरे मल्हारदेवाचे असावे ( फ़ोटो ). शंकराच्या मंदिरात कुणीतरी राहत असल्यामुळे कुलूप होते..पण दुसर्या मंदिरात आतमध्ये बसून विश्रांती घेता येईल. - जण बसू शकतील एव्हढे मोठे हे मंदिर आहे. वरून पुरंदर, कानिफ़नाथ वैगरे दिसू शकतात ( फ़ोटो ). कानिफ़नाथ, मल्हारगड ही सर्व भुलेश्वरच्या रांगांवरील ठिकाणे. जास्ती उंचही नाहीत. पूर्वेकडे पाहिले तर लांबच लांब पठार दिसते. बाकीच्या गडांसारखे मनोहारी दृश्य दिसत नसल्यामुळे हा किल्ला तसा उपेक्षीतच आहे. (मनोहारी हा शब्द व्यक्तीसापेक्ष आहे) . गडावरून दिसणारे दृश्य . वरती मस्तानी तलावाविषयी लिहायचे राहिले. दिवे घाट चढताना मस्तानी तलाव दिसतो. तलाव बर्यापैकी मोठा आहे.. आणी जुन्या पद्धतीचे बांधकाम आहे. दिवेघाटातून दिसणारा मस्तानी तलाव ( फ़ोटो )। बापदेव घाटाच्या माथ्यावरही एक मंदिर आहे. ह्या घाटातूनही पुणे मस्त दिसते. बापदेव घाटापासून कानिफ़नाथा पर्यंत जागा बहुतेक विकली गेली असावी. तिथे तालाब असा बोर्ड आहे. एका दिवसात मल्हारगड-कानिफ़नाथ करून संध्याकाळच्या आत पुण्यात येता येते. सकाळी :३० ला निघून वडकी वरून आम्ही कानिफ़नाथ केले आणी झेंडेवाडी तून जाऊन मल्हारगड केलायेताना बापदेव घाटातून परत पुण्यात :१५ च्या आसपास पोचलो. :-आनंद